फिस्टुला (भगंदर) का होतो? जाणून घ्या तज्ज्ञांकडून - डॉ सम्राट जानकर

5 hours ago
5

ॲनल फिस्टुला किंवा फिस्टुला-इन-ॲनो ही एक ॲनोरेक्टल स्थिती आहे जिथे गुदा कालवा आणि पेरियानल त्वचेदरम्यान एक असामान्य बोगदा तयार होतो. गुदेच्या आतील भागात आठ ते दहा ग्रंथी असतात, जे आपल्या स्रावाने मलमार्ग सुगम ठेवतात. या ग्रंथींमध्ये इन्फेक्शन होणे किंवा सूज येणे हा प्रकार वारंवार घडत असतो. याने रुग्णाला विशेष त्रास होत नाही आणि त्यामुळे त्याकडे विशेष लक्षही दिले जात नाही; पण एखाद्या वेळी हा आजार उग्ररूप धारण करतो आणि त्यामुळे अनेक पेच निर्माण होतात. या त्रासाची सुरुवात गुदेमध्ये दुखण्यापासून होते आणि मलमार्गात काहीतरी बाहेर येण्यास तत्पर आहे, असा भास होऊ लागतो. हे दुखणे खाली बसल्यावर, खोकल्यानंतर शौच झाल्यावर अधिक तीव्र असते. थंडी वाजून ताप येणे, वारंवार लघवी करायची इच्छा होणे असेही घडते. दुखऱ्या जागेवर हात लावून बघताना तिथे एखादी गाठ किंवा सुजलेला भाग जाणवतो. आत पू असल्यामुळे तो भाग टंच आणि गरम लागतो. जर या अवस्थेतही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर ती गाठ फुटते आणि पू वाहू लागतो. रुग्णाला दुखणे कमी वाटायले लागते, ताप उतरून जातो आणि काही दिवसाने आराम होतो. मात्र, हा आराम अस्थायी स्वरूपाचा असतो. कारण अनेकदा त्याची परिणिती भगंदरमध्ये होते आणि वारंवार त्रास देऊ लागते. जेव्हा पू भरलेली गाठ आपोआपच फुटते तेव्हा ती बाहेर त्वचेवर एक छिद्र बनवते आणि तसेच छिद्र मलाशयामध्येही तयार होते. ही दोन्ही छिद्रे एका गुहेसारख्या मार्गाद्वारे आपसात जोडलेली असतात. या दोन तोंडाच्या व्रणालाच ‘फिश्चुला’ असे म्हणतात. या गुहेसारख्या जागेमध्ये विष्ठा आणि अन्य दूषित पदार्थ जमा होत राहतात. हे मार्ग स्थायी स्वरूपाचे होऊन जातात. छिद्र नेहमी उघडे राहते. जेव्हा या मार्गामध्ये जमा होणारी घाण त्या जागेच्या क्षमतेपेक्षा अधिक होते, तेव्हा हा जमलेला स्राव बाह्य छिद्रावर जोर देतो आणि ते छिद्र मोठे होऊ लागते. त्यातून पातळ पू झिरपू लागतो. हे स्रवणे काही दिवसांपर्यंत सुरू राहते आणि आतली जागा रिकामी झाल्यावर छिद्र हळू-हळू पुन्हा बंद व्हायला लागते; पण आतले छिद्र आणि मार्ग मात्र तसेच राहतात. ज्यामुळे पुन्हा मल त्यात जमा होऊ लागतो आणि या दुष्टचक्राची पुनरावृत्ती होत राहते. हा क्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. काही रुग्णांना वारंवार होणाऱ्या या विकृतीमुळे दोन किंवा अधिक छिद्रे उत्पन्न होतात. त्या प्रत्येकातून पू वाहात राहतो. जीर्णावस्थेत पोहोचलेल्या जुन्या भगंदरच्या आत कॅन्सर होण्याचीही शक्यता असते.

Loading comments...